जिजाऊ जन्मस्थळ-सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा):
१५७६ च्या सुमारास निजामशाहीच्या काळात भरभराटीला आलेले शहर म्हणजे सिंदखेड.या गावची देशमुखी विठोजी पुत्र लखुजीराजे जाधवराव यांना मिळाली.आणि याच काळात सिंदखेडमधे जाधवरावांनी एक भुईकोटवजा वाडा बांधून घेतला.
सिंदखेड नगरात अनेक वाडे-महाल उभे राहिले,तलाव खोदले, पाण्याच्या बारावा कोरल्या,पडक्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला,मंदिरांना पुजारी आले पूजा-अभिषेक सुरु झाले.सिंदखेड परगण्याचा कारभार जाधवराव मंडळी नेटाने चालवू लागली,लखुजीराजांचा धाकटा भाऊ जगदेवराव खांद्याला खांदा लावून कारभारात लक्ष देत असे.राजे लखुजीना म्हाळसा उर्फ गिरिजाबाई यांचेकडून चार पुत्र होते,दत्ताजी,राघोजी,अचलोजी आणि बहादुरजी परंतु कन्यारत्न नव्हते. राणी म्हाळसाबाई रेणुकादेवीच्या निस्सीम भक्त होत्या, त्यांनी देवीला नवस केले,आणि देवी नवसाला पावली.
जिजाऊ जन्म :
हेमलंबी नाम संवत्सर शके १५१९ पौष शुद्ध पौर्णिमा गुरुवार या दिवशी पुष्य नक्षत्रावर सूर्योदय समयी म्हणजेच इंग्रजी कालगणनेनुसार १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी ६ च्या सुमारास म्हाळसाबाईंनी कन्यारत्न जन्मास घातले.अवघ्या हिंदुस्थानाचा इतिहास बदलायला याच दिवशी सुरुवात झाली असे म्हणता येईल.
राजे लखुजी बहुत खुश झाले,नगारे वाजू लागले,हत्तीवरून साखर वाटली गेली.मोठे नगरभोजन झाले.लखुजींचे धाकले बंधू जगदेवराव सोबत शंभर स्वार घेऊन सपत्नीक तुळजापूरला जाऊन देवीची ओटी भरून आले.
जिजाऊ जन्मस्थळ:
जाधवराव बखरीच्या उल्लेखानुसार राजवाड्याच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हाळसा महाल होता.याच ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला. राजवाड्याला १२ दालने असलेले तळघर आहे. त्याच्या वरच्या बाजूस महालाची जोती आणि एक खोली शिल्लक आहे. हेच जिजाऊ जन्मठिकाण मानले जाते.
सिंदखेड इतर वास्तू,अवशेष यादी:
सध्या वाड्यात मुख्य प्रवेशद्वार,तटबंदी,अनेक कोरीव मूर्ती-दगड,काही तोफा,तसेच१२ दालने असणारे तळघर,राजवाड्याची जोती,चौक,रंगमहाल,जिजाऊ जन्मस्थळ इत्यादी अवशेष आहेत.
काळा कोट हा खणखणीत तटबंदीचा भुईकोट बाजारपेठेच्या बाजूस आहे (दुर्दैवाने याचे बांधकाम कधीच पूर्ण झाले नाही) याच कोटात हत्याराना धार लावायचे विशिष्ट गुणधर्म असलेल्या पाण्याची एक विहिर आहे.
याशिवाय सिंदखेड मधे राजे लखुजी, दत्ताजी,अचलोजी,राघोजी,आणि यशवंत यांच्या समाध्या, निळकंठेश्वर मंदिर,रामेश्वर मंदिर,रेणुका मंदिर, मोती-तलाव ,चांदणी-तलाव,सजना-बारव,पुतळा-बारव,गंगासागर,बाळसमुद्र असे अनेक इतिहासाचे साक्षीदार आजही उभे आहेत.
सिंदखेड मधील काही शिलालेख :
१) लखुजीराजे समाधी बाहेरील बाजू डावी :
ओळ १- सींदखेडचे देशमुख भानवसे वीटोजी सौ
ओळ २- अरधांगी ठाकराईराणी त्यांचे पोटी जाधवराव लुकजी म
ओळ ३- हाराज अरधांगी गिरिजाईराणी त्यांचे पोटी पुत्र दत्ताजी व
ओळ ४- अचलाजी व राघोजीराजे व जाधवराव लखुजी व पु
ओळ ५- त्र दत्ताजी त्यांचे पोटी येसवंतराजे व लिंबाजी
२) लखुजीराजे समाधी बाहेरील बाजू उजवी :
ओळ १- सींदखेडचे देशमुख भानवसे वीटोजी त्यांचे अरधांगी
ओळ २- ठाकराईरानी त्यांचे सुपुत्र लखुजी महा-(राज)
३) निळकंठेश्वर मंदिर नंदीमागे खांबावर:
ओळ १- नीळ
ओळ २- कंट
ओळ ३- श्रीगणेशाय न
ओळ ४- मः साके १५०९
ओळ ५- सार्वजीत सवत्स
ओळ ६- रे श्रावण सुदि पा
ओळ ७- डवा जीर्णोद्धार हे
ओळ ८- देऊळ धबाळे रा
ओळ ९- घोजी लकुजी जाधव
ओळ १०- श्री देक्षमूष परग
ओळ ११- णे सीधपूर
४) सती समाधी लखुजी समाधीच्या समोर :
ओळ १- ll सके १६३७ मनमथ नाम संवत्सरे आ
ओळ २- ll श्वि (न) सुधि दशमी ते दिवशी मोरतब ll
ओळ ३- षडोजी याधव अरधंगी सोरबाबाई
ओळ ४- सती ll सेवक तेजजी नारायणजी जाधो
सिंदखेड च्या भेटीत जिजाऊ जन्मस्थानी नतमस्तक तर व्हावेच पण संपूर्ण गावात अभ्यासू नजरेने फेरफटका नक्की मारावा, पूर्वेतिहासाची साक्ष देणारे कोरीव दगड मूर्ती सर्वत्र पसरलेल्या आहेत.
-अजय काकडे
संदर्भ :
जाधवराव बखर
पुरातत्व खाते पुस्तिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा